हीच खरी "गुरू-दक्षिणा "
वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक , स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांनी सन १९१७ साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली.ही केवळ एक शिक्षण संस्था नव्हे तर अध्यात्मज्ञानाची अविरत वाहणारी गंगाच म्हणावी लागेल !स्थापने नंतर एक शतक पूर्ण करुन दुसऱ्या शतकातही या ज्ञानगंगेचे वाहणे सुरुच आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिकता जपण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे.महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहासात जोग महाराजांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल.
तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे "पुर्व पुण्य ठेवा ओढवला " या न्यायाने व पूर्वजांच्या पुण्याईने या ज्ञानगंगेत ४ वर्षे गुरुजनांच्या सानिध्यात अवगाहन करण्याचा योग प्राप्त झाला.
संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले आदर्श गुरुजन. वैराग्य-भक्ती-ज्ञान या त्रिगुणांचा अंगीकार केलेली ही सर्व मंडळी. अगदी जोग महाराजांपासून तर सांप्रत कालच्या गुरुजनांपर्यंत सर्वच मंडळी हिमालयाच्या तोडीची आहे.
या लेखाच्या निमित्ताने मला संस्थेत तिसऱ्या वर्षत शिकत असतानाचा एक प्रसंग विशद करावासा वाटतोय. तिसऱ्या वर्षाच्या तृतीय सत्रात ज्ञानेश्वरीच्या निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाची पूर्तता झाली होती. तृतीय सत्रात ज्ञानेश्वरी शिकवणारे, धीरगंभीर व्यक्तिमत्त्व असलेले प.पू. श्रीगुरु भास्कर महाराज शिंदे तसेच प.पू. श्रीगुरु मोठे कदम माऊली यांचे पूजन त्यानिमित्ताने करण्याचे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी योजिले.
मुळात "पुज्यता डोळा न देखावी ।स्वकीर्ती कानी ना ऐकावी । हा आमुका ऐसी नाहावी । से ची लोका ।।
या ज्ञानराज माउलींच्या ओवी नुसार जीवन जगणाऱ्या या व्यक्ती ! पण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी या सर्व गोष्टींचा स्वीकार केला. दोन्ही गुरुजनांच्या पूजनानंतर आम्हाला जो तत्वोपदेशाचा प्रसाद मिळाला तो फार महत्त्वाचा होता. प्रथमतः श्रीगुरू भास्कर महाराज शिंदे यांनी "शुद्ध चर्या हे संताचे पूजन" या संतवचनाने सुरुवात केली. ते म्हणाले : तुम्ही आमची पूजा केली हा एक औपचारिकतेचा भाग झाला, पण खऱ्या अर्थाने आमची पूजा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही संपूर्ण आयुष्यभर निष्कलंक चारित्र्य ठेवाल ! शुद्ध आचरण हीच खरी संतांची - गुरुजनांची पूजा आहे. बाबांचा प्रत्येक शब्द हा आम्हा विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारा होता.
त्यानंतर गुरुवर्य मोठे कदम माऊली म्हणालेे, आम्हाला तुमच्याकडून या असल्या पूजेची अपेक्षा नाही. तुम्ही संपूर्ण आयुष्यभर साधना करीत रहाणे यातच आमचे समाधान आहे. तुम्ही सर्वांनी चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर गाथा - ज्ञानेश्वरी पाठ करावी हीच आम्हाला गुरुदक्षिणा असेल! आणि ही गुरू-दक्षिणा तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा करतो.
खरंतर अशा गुरुत्वाच्या पदवीला वारंवार साष्टांग प्रणिपात करणेच योग्य आहे. शिष्याचं आत्मकल्याण व्हावं याची अत्यन्त पराकोटीची तळमळ या गुरुजनांच्या ठिकाणी दिसते.
गुरुवर्य मोठे माऊली हे सगळ्या गोष्टींनी मोठे आहेत. ज्ञानाने, भक्तीने , साधनेने , वैराग्याने ! सतत साधनेत रत असतात. संस्थेत चौथ्या वर्षात ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायाचं चिंतन सुरु असताना "अमानित्वमदंभित्वम्" या श्लोका खालील ओव्याचं चिंतन करत असताना प्रत्येक ओवीमध्ये मला मोठ्या माऊलींचे दर्शन व्हायचं. असं वाटायचं ज्ञानराज माऊलींनी या ओव्यांतून ज्या भक्त महात्म्याचे वर्णन केले आहे तो महात्मा दुसरा तिसरा कोणी नसून आपले गुरुवर्य मोठे माऊलीच आहेत. आणि त्या ओव्या वाचत असताना मन भरून यायचं. अशा प्रकारचे गुरुजन लाभणे पांडुरंगाच्या कृपेचा प्रसाद आहे.
काही दिवसापूर्वी गुरुवर्य मोठे माऊलींची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भेटण्यासाठी गेलो होतो. गुरुवर्यांचं दर्शन घेऊन अत्यंत प्रसन्न वाटलं. त्यानंतर माऊलींनी पहिलाच प्रश्न विचारला : दीपक महाराज ज्ञानेश्वरीचं पाठांतर सुरु आहे का ? या प्रश्नाला खाली मान घालूनच " नाही" असं उत्तर द्याव लागलं. त्यानंतर माउलींनी पुन्हा दोन-तीन वेळेस आग्रहपूर्वक सांगितले की "ज्ञानेश्वरी पाठ करा! ज्ञानेश्वरी पाठ केल्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही."
आताच्या या घडलेल्या प्रसंगावरून संस्थेतील तिसऱ्या वर्षात घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. विद्यार्थ्यांच्या आत्मकल्याणासाठी किती हा अट्टाहास ! गुरुवर्यांच्या भेटीनंतर तो प्रसंग सतत मनात घोळत होता. लिहिण्याचा मोह आवरला नाही म्हणूनच हा सगळा शब्दप्रपंच !
!! राम कृष्ण हरी !!
- पंढरीचा वारकरी दिपक शिंदे.
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा