बोधसंपन्न रामचंद्र बाबा बोधे.....

प.पू.श्रीगुरु रामचंद्र बाबा बोधे यांचा पुण्यतिथी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी साजरा करत आहे. त्यानिमित्ताने बाबांच्या चरणी शब्द कुसुमांजली...

मी२०१५ साठी पंढरपूरला चातुर्मासात होतो.श्रीगुरू बोधे बाबांच्या मठात वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य श्रीगुरु वै.निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे प्रवचन सुरू होते. वक्ते  बाबांनी प्रवचनासाठी          
        महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: l
        भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम् ll

हा गीतेतील श्लोक निवडला. सदर प्रसंगी बाबांनी श्लोकातील "महात्मा" या पदाला प्राधान्य देऊन संपूर्ण प्रवचन केले. त्यावेळेच वक्ते बाबांचं एक वाक्य याठिकाणी उद्धृत करावसं वाटतं...
"हल्ली लोक कुणालाही महात्मा म्हणतात पण खरा महात्मा आमचे बोधे बाबा आहेत;कि जे दैवी सद्गुण संपत्तीने युक्त आहेत."
श्रीगुरु बोधे बाबांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सहवासात काल घालवला असेल, त्या त्या प्रत्येकाला आपलं जीवन सार्थकी लागल्याचा नक्की अभिमान वाटत असेल !

आपल्या रामचंद्र या शुभ नावांनुरुप रामवत त्यांचा आचार होता. बाबा कीर्तन करत नव्हते, प्रवचन करत नव्हते, कथा करत नव्हते आणि त्याद्वारे समाजाला कधीही उपदेश करत नव्हते परंतु त्यांच्या आचाराकडे बघून आळंदी पंढरीतील अनेक साधकांंनी आपले जीवन सदाचार संपन्न  बनवले . बाबांचं जीवन हे अत्यंत नियमित होतं. एक वेळेस घड्याळ आगेे-पीछे होईल पण कुठलीही वेळ कधीही त्यांच्या जीवनात चुकली नाही. पहाटेच चंद्रभागा किंवा इंद्रायणीचे स्नान, प्रदक्षिणा, काकड आरती, धुपारती, एकादशी निमित्त तीन दिवसांचा कठोर उपवास, चार महिने चातुर्मास, चातुर्मासात दररोज पाच-सहा तास भजन अशा कितीतरी नियमांनी नियमित बाबांच जीवन होतं.
अनेक प्रकारच्या वारकरी सांप्रदायिक निष्ठांनी संपन्न जीवन होतं. मग ती भजनावरची निष्ठा असेल, पंढरपुर वारीची निष्ठा असेल, गाथा ज्ञानेश्वरी या सद्ग्रंथावरील निष्ठा असेल  किंवा आळंदीच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या  परंपरेवरची निष्ठा असेल !

अखंड पारमार्थिक बोध सरोवरामध्ये विहार करणारे
राजहंस रामचंद्र बाबा बोधे होते.
वारकरी संप्रदायातील विद्वान प्रभृती वै.शंकर महाराज खंदारकर म्हणायचे, हल्लीच्या काळात जर तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे असेल तर रामचंद्र बाबा बोधे यांचे दर्शन घ्या. बाबा म्हणजे अलीकडच्या काळातील दुसरे तुकोबारायचं आहेत.
सतत बाबा कुठल्या ना कुठल्या आध्यात्मीक साधनेमध्ये रत असायचे. प्रदक्षिणा, दर्शन, काकडा , आरती , विद्यार्थ्यांचा पाठ , भजन हे सर्व नियम पूर्ण करण्यातच बाबांचा दिवसातील सर्व काळ जायचा. याव्यतिरिक्त बाबांच्या खोलीत जाऊन कधीही पाहिलं तर समोर ज्ञानेश्वरी,गाथा किंवा भजनी मालिका यापैकी एकाच पारायण करताना बाबा दिसायचे. हा सर्व जीवनक्रम बघून तुकोबांचं 
‌"येणे बोधे आम्ही असो सर्वकाळ l
करू हे निर्मळ हरिकथा ll"

हे प्रमाण आठवल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीतील "अमानित्वमदम्भित्वम्"हे पद बाबांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर क्षणोक्षणी प्रतीत होते. अगदी काही दिवसांपूर्वी नाथांच्या चिरंजीव पदातील ओव्यांच चिंतन करत असताना सात्विक वैराग्य संपन्न पुरुषाचं वर्णन असलेल्या प्रत्येक ओवी मध्ये श्रीगुरु बोधे बाबांचं दर्शन व्हायचं. चातुर्मासात असताना सकाळी ६ वाजता बाबा भजनाचा पाठ घ्यायचे. दररोज एक नवीन चाल ते पाठात शिकवायचे. तेव्हा बाबांच्या सानिध्यात बसून वारकरी सांप्रदायिक भजन चाली श्रवण करण्याचा, शिकण्याचा महद्योग जीवनात प्राप्त झाला. बाबांच्या सहवासात मला आपण आपल्या आईच्या सहवासात, आईच्या कुशीत असल्याचा जाणवायचं. कारण बाबा हे प्रत्येक साधकासाठी आईचं होते. मात्र या काळात बाबांची सेवा न घडल्याची खंतही मनात आहे.
    माझ्यासारख्या अल्पधी, सेवारहीत ,बोधशून्य अजाण बालकाने बाबांच्या जीवनाला शब्दात बांधणे कदापि शक्य नाही.तरी सुद्धा आई विषयी बालकानेे बोललेले वेडेवाकडे बोलही आईला अत्यंत प्रिय असतात. हे जाणूनच हा सगळा शब्दप्रपंच !

राम कृष्ण हरी...

ह.भ.प.दिपक महाराज शिंदे  (एम.ए.बीएड संस्कृत) ९६७३०६०५६९


टिप्पण्या

  1. ऐसे भाग्य जेणे सर्वस्वी साधावे ! तरीच जन्मा यावे विष्णूदासा ! रामकृष्णहरी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

    उत्तर द्याहटवा
  2. आपण लिहील. आपले कौतुक कराव.अस वाटल.मी बाबांच्या संपर्कात कधीच आलो नाही.तरीही बाबांच जेव्हा निर्वाण झाल. तेव्फाहा मात्र मी स्वता.बाबांच्या अंत्यविधीसाठी आळंदीत आलो.माझ नशीब मी शेवटच्या क्षणी त्यांना निरोप देताना हजर होतो.डोळ्यात आश्रु आले.गहीवरुन आल बाबांच्या बद्दल.मी मनोमन श्रध्दांजली अर्पण केली.आणि घरी आलो.
    त्या नंतर.मी घरीच हरीपाठ सुरु केला.आणि अनेक ग्रंथाची पारायणे केली.हा मला मिळालेला बाबांचा आर्शिवाद आहे.
    बाबांचे चरणी कोटी कोटी प्रणाम.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....