सेवेलागी सेवक झालो.....

 सेवेलागी सेवक झालो..
     महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात दत्त जयंती निमित्ताने वेगवेगळे अध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आमच्या योगवेदांत आश्रमात येणाऱ्या कोकणातील काही मंडळींनी मला काही दिवसांपूर्वी किर्तन सेवेकरिता पाचारण केलं.तसेच मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरलेला होता. असं वाटलं नव्हतं की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि कीर्तनाचा कार्यक्रम एकाच दिवशी येईल. आणि नेमकं तेच झालं. ज्या दिवशी कीर्तन सेवा होती त्याच दिवशी सीटेटचा पेपर आला.आता माझ्यासाठी परीक्षा ही महत्त्वाची होती. आणि कीर्तन सुद्धा. भावी जीवनासाठी परीक्षा तर वारकरी सांप्रदायिक सेवा म्हणून कीर्तन महत्त्वाचे ! एक प्रकारच्या कात्रीत सापडल्यासारखं झालं. 
मी असा विचार केला की दोन्ही पेपर कसेबसे पूर्ण करून कीर्तन सेवेकरीता जायचं. परंतु दुसऱ्या पेपरची वेळ दु.२:३०ते ५ अशी होती. त्यामुळे पुण्यातून आळंदीला येऊन पून्हा चाकण आळेफाटा व ओतूर या मार्गाने मुंबईकडे जायचं होतं. आणि हे सगळं वाहतूक कोंडीचा विचार करता अशक्य होतं. मी कीर्तन सेवा ही रद्द केली नव्हती त्यामुळे समोरच्या व्यक्तींना पर्यायी कीर्तनकार उपलब्ध होणे ही अशक्य होते. शेवटी निर्णय घेतला की शिक्षक पात्रता परीक्षेचा फक्त एकच म्हणजे पहिला पेपर द्यायचा आणि कीर्तनासाठी जायचं. शिक्षक पात्रता परीक्षेचा १ला पेपर दुपारी १२वा. झाला त्यानंतर १२:३०च्या दरम्यान आळंदीला यायला निघालो. पुणे महामंडळाच्या बसेस बदलत-बदलत आल्याने आळंदीत येई पर्यंत जवळजवळ दुपारचे ३ वाजले होते. नंतर थोड्यावेळात आवरून ३:३०च्या दरम्यान आम्ही किर्तन सेवेकरिता जाण्यासाठी निघालो. पुढे चाकण , खेड सोडल्यानंतर ४:१५च्या दरम्यान मला माझे "शिक्षक पात्रता परीक्षा" देणारे मित्र अमोल बुवा लंबाटे यांचा फोन आला. मी थोडासा चकित झालो,कारण शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर ५ वाजता संपणार होता आणि यांचा फोन वेळेच्या आधीच आला कसा ? फोनवर ते बोलले कि दुसरा पेपर काही तांत्रिक समस्येच्या अडचणीमुळे रद्द झाला. सुरुवातीला विश्वास बसत नव्हता कारण केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारी ही परीक्षा आहे. त्यामुळे असे ढिसाळ नियोजन कसे होऊ शकते? पण हे खरोखरच झाले होते. नंतर माझी मुंबईची बीएडची सहपाठी मैत्रीण रुचिरा गुरुळे हिचाही फोन आला दीपक सर शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा पेपर झालाच नाही.
       पेपर रद्द होण्याची कारणे भिन्न भिन्न असू शकतात. परीक्षेसाठी सेंटरवर उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यामुळे निश्चितच हिरमोड झाला असेल. पण मला मात्र ही गोष्ट समाधान देणारी ठरली की मी जे काही केलं होतं ते योग्यच केलं होतं. कीर्तन सेवा रद्द केली असती तर किर्तन आणि परीक्षा या दोन्हींनाही मुकावं लागला असतं... कदाचित किर्तन सेवेबद्दलच्या श्रद्धेचा परिणाम म्हणून माझा अचूक निर्णय झाला त्याबरोबरच पेपर तर रद्द होणारच होता....
      यापुढेही भगवान पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाने यावत्जीवन पर्यंत सेवा करून घ्यावी. आणि ही सगळी सेवा करताना अहंकाराचा वारा मनाला न लागो हीसुद्धा कळकळीची प्रार्थना....
राम कृष्ण हरी...
दिपक महाराज शिंदे 
9673060569

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....