!! गणेशोत्सवाचा विपर्यास !!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान आणि अमूल्य रत्न म्हणून आपण सर्वजण ज्यांना ओळखतो असे लोकमान्य टिळक.लोकमान्यांनी इंग्रजी शासनाला उलथून पाडण्यासाठी सामाजिक ऐक्य व जनजागृती निर्माण व्हावी तसेच समाजात ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता पारंपरिक गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले . हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे

   पण टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा स्वातंत्र्यानंतर विपर्यास व्हायला सुरुवात झाली.त्या विपर्यास सर्वोच्च  दर्शन म्हणून आपल्याला हल्लीच्या  गणेशोत्सवाकडे पाहता येईल.
   लोकमान्यांचा  या उत्सवामागील हेतू स्वातंत्र्य प्राप्तीच्या इच्छेने जनजागृती व सामाजिक ऐक्य होता तर सद्या आम्ही फक्त गतानुगतिको लोक: न पारमार्थिक: या न्यायानेच तो साजरा करतोय.
   तत्कालीन उत्सवाचं स्वरूप आणि सांप्रत कालीन उत्सवाचं स्वरूप यात जमीन आसमान एवढी तफावत पाहायला मिळते.पूर्वी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने व कमी खर्चात साजरा करण्यात येत असे .त्यात सांस्कृतिकता सामाजिकता नैतिकता यांना महत्त्वाचे स्थान होते. कोणताही उत्सव किंवा समारोह साजरा करायचा तर त्यासाठी पहिली गरज भासते ती पैशांची! कारण ज्याचा खिसा गरम त्यालाच देवधरम ! ही पैशांची अडचण वर्गणीच्या रूपाने सोडवली जायची. पुर्वी ती वर्गणी ऐच्छिक होती तर आता मात्र बळजबरीने दादागिरी करून खंडणीच्या स्वरूपात वसूल केली जाते.
   तत्कालीन उत्सवामध्ये कुंभार काकांनी बनवलेल्या मातीच्या मूर्ती असायच्या आणि त्या साध्या रंगाने रंगविलेल्या जायचा पण हल्ली पीओपी पासून बनवलेल्या आणि केमिकल युक्त रंगांनी रंगवलेल्या असतात ज्या विसर्जनानंतर जलप्रदूषनास कारण होतात.


   पूर्वी गणेश मंडळापुढे व्ही.सी.आर वर सिनेमा दाखवला जायचा तर कधी गावातील तरुण जनजागृतीपर नाटकेही सादर करायचे.व्याख्याने, प्रवचने ,कीर्तने यांच्या माध्यमातून या उत्सवात श्रद्धेबरोबरच विचारांचीही देवाण-घेवाण व्हायची. पण आता हे सगळं काळाआड जाऊन कर्णकर्कश तसेच डोकेदुखीला कारण होईल असा आवाज असलेल्या डॉल्बी साऊंड वर तरुणाई मद्यधुंद अवस्थेत बेताल नृत्य करताना दिसत आहे

रात्र-रात्र गणेशा पुढे पत्त्यांचे डाव मांडून बसताना या मंडळीला अजिबातही शरम वाटत नाही.
   खरंतर या लोकांकडून वैचारिक प्रबोधनाची आपण अपेक्षाच करणे व्यर्थ आहे .कारण जे लोक सद्विचार आणि सद्वर्तनापासून कोसो दूर आहेत. ज्यांना धर्माच्या बाबतीत काय आणि काय हेही कळत नाही. यापेक्षा पुढे जाऊन सांगायचे तर गणरायाची आरती पाठ नसलेला मनुष्य या मंडळाचा अध्यक्ष असतो. लोकमान्यांनी हा उत्सव कशासाठी सुरु केला ? त्यांचा हेतू काय होता हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते.
उत्सव म्हणजे निव्वळ आनंद ! पण सध्या तो बनला गोंगाट आणि धिंगाणा .उत्सव हा विचारांचा हवा! उत्साहाचा हवा! प्रेरणेचा हवा! प्रबोधनाचा हवा! पण उलटच सगळं दृष्य बनत चाललंय अगदी थोडक्यातच मांडायचं तर ते असं
        बदले जुना जमाना lनटले नवीन रंग ll
        बदलेही उत्सवाचा l सगळाच रागरंग ll
        गेली कथा-पुराणे l संकीर्तनेही गेली ।।
    व्याख्यान प्रवचनानी । तर धूमच ठोकीयेली ।।
प्रेरणा आणि आनंद देणारा उत्सव आता तरुणाईला अधोगतीच्या खाई मध्ये ढकलणारा बनलाय. या काळात विजेचा बेसुमार वापर होत आहे आणि सुमारे १२०० कोटी रुपये एवढा अफाट खर्च होतो. आणि इतके पैसे खर्च होऊनही हा उत्सव वैचारिक ,नैतिक, सामाजिक, धार्मिक, भावनिक दृष्ट्या जर लाभदायक नसेल तर तो निरर्थकच ठरतो.
वर मांडलेल्या परिस्थितीला अपवाद असलेली ही काही गणेशोत्सव मंडळे नक्की आहेत पण त्यांची संख्या फार थोडी आहे. खरं तर या उत्सवाची सूत्रे विचारवंताकडे जाऊन याला प्रबल वैचारिक अधिष्ठान प्राप्त होणे गरजेचे आहे. आगामी गणेशोत्सवाचा विचार करून बुद्धीची देवता असलेल्या गणरायाला आपण सर्वजण प्रार्थना करूया की सर्वांना सन्मती दे !

        दुरितांचे तिमिर जावोlविश्व स्वधर्म सूर्ये पाहो l         जो जे वांछील तो ते l लाहो प्राणीजात ll


!!धन्यवाद!!🚩

ज्ञानेशकिंकर -दीपक नवनाथ शिंदे

(माजी विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे.) संपर्क- 7666684060,9673060569.


टिप्पण्या

  1. अशा दुष्ट प्रवृत्ती कडे ओळत्या करण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या विपर्यासावर काळानुरूप सकारात्मक विचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून आपले विचार प्रेरणादायी आहेत.
    राम कृष्ण हरी

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान! परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्यासाठी समाजमन तयार व्हावे म्हणून अशा विचारांची खूप गरज आहे. अतिशय सूत्रबद्ध आणि शास्त्रीय मांडणी करून लेख लिहिल्याचे जाणवते. अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान! आजच्या परिस्तिथीचे वर्णन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....