गीताई माऊली माझी
आज गीता जयंती (५१४१वी)..
"गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता l
पडता रडता उचलूनी घेई कडेवरी ll"
श्रीमद्भगवद्गीता हे मानवी जीवनाचे सार आहे. जिचे पठण अध्ययन केल्यानंतर आपल्याला योग्य मार्ग निश्चितच आपल्या जीवनामध्ये मिळू शकतो. गीतेचे महत्व टिकून राहावे यासाठीच आपल्या भारतीयांमध्ये गीता जयंती साजरी केली जाते . सनातन हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ग्रंथाची जयंती म्हणजेच गीताजयंती होय. भगवद्गीता हा जीवन मंत्र आहे , म्हणूनच हजारो वर्षांपासून मानवाला पथप्रदर्शन करीत आला आहे. आणि म्हणूनच याला अत्याधिक पवित्र ग्रंथ मानले जाते.
"भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्र मध्ये अर्जुनाचा मोह निवृत्त होण्याकरता केलेला उपदेश होय." अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये , आपल्या नातेवाईकांना पाहिल्यानंतर मोहग्रस्त होतो आणि अशा मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाचा मोह निवृत्त व्हावा म्हणून भगवान जो उपदेश करतात तो गीता होय आणि भगवंतांनी हा उपदेश ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे "मार्गशीर्ष शुक्ल एकादशी" अर्थात मोक्षदा एकादशी !
भगवद्गीतेचा जन्म भगवान श्रीकृष्णांच्या मुखकलातून आणि कुरुक्षेत्रामध्ये झाला.
गीतेत आपल्याला सर्व ठिकाणी मानवतेचा उपदेश केलेला दिसतो. गीता धर्म ,जात, संप्रदाय या चौकटीत स्वतःला बांधून घेणारी नाही तर विश्वव्यापक आहे. गीतेचे अठरा अध्याय म्हणजे मनुष्याचा धर्म आणि कर्म यांचा लेखाजोखा आहे. तिच्यामध्ये सत्ययुगापासून कलियुगा पर्यंत मनुष्याच्या कर्मा आणि धर्माचे ज्ञान आहे. गीतेच्या प्रत्येक श्लोकांमध्ये मनुष्यजातीचा आधार लपलेला आहे. मनुष्याचं कर्म कोणतं आणि त्याचा धर्म कोणता ? याचं विश्लेषण स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुखाने दिलेलं आहे. ज्यामुळे मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
मानवी जीवनामध्ये उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांना अर्जुनाने गीतेत भगवान श्रीकृष्ण समोर उपस्थित केले आहे आणि त्याचे उत्तर स्वतः भगवंतांनी दिलेलं आहे. गीतेचे श्लोक मनुष्यजातीला आपल्या कर्तव्य आणि धर्माचे ज्ञान करून देतात. मुळात गीतेचा जन्मच मनुष्याला त्याचा खरा धर्म काय आहे हे समजून देण्याच्या हेतूनेच झालेला आहे.
कलियुग एक असं युग आहे ज्यामध्ये गुरु किंवा ईश्वर स्वतः या मेदिनी तलावरती मिळणे आणि प्राप्त होणे अति दुर्लभ आहे. जे भटकणाऱ्या अर्जुनाला स्वतः पथ प्रदर्शन करतील ! या परिस्थितीत गीतेचा उपदेश हा मनुष्याला योग्य मार्ग दाखवितो. निश्चितच एक हिंदु धर्मच असा आहे की, यामध्ये कोणत्यातरी एका ग्रंथाची जयंती साजरी केली जाते. याचा हेतूच मनुष्यामध्ये गीतेचे महत्व जागृत ठेवणे असा आहे. या कळिकाळा मध्ये एक गीताच असा सद्ग्रंथ आहे की, जो आम्हाला जीवनप्रवासात कल्याणपर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन करतो.
विशेष म्हणजे नुसता हिंदू धर्मीयांमध्ये हा ग्रंथ लोकप्रिय नाही तर सर्वच धर्मीयांमध्ये गीतेची लोक प्रसिद्धी आहे.अनेक भारतीयांनी गीतेला आपल्या जीवनाचा ग्रंथ बनवले आहे संपूर्ण जीवनच गीतेला समर्पित केलेलं आहे. आत्तापर्यंत असंख्य टीका गीतेवर झालेल्या आहे .गीतेवर जितकं बोललं गेलं तीतकं अन्य कुठल्याही ग्रंथाबद्दल बोललं गेलेलं नाही. असो या ग्रंथाबद्दल कितीही बोललं तरी कमीच पडणार आहे म्हणून शब्दांना आवर घालने गरजेचे आहे.
गीता जयंती कशी साजरी करावी ?
1.या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करावे.
2.भगवान श्रीकृष्ण तसेच गीतेची पूजा करावी.
3.तसेच नामस्मरण , भजन व आरती करावी.
4.विद्वानांनी शक्य असेल तर गीतेवर प्रवचने द्यावी गीतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावे. ज्यामुळे मनुष्यामध्ये मध्ये गीतेचे महत्त्व वाढीस लागून गीतेकडे प्रवृत्त झाल्यामुळे सहजच त्यांच आत्मकल्याण साधला जाईल.
5. या दिवशी श्री आपण उपवासही करू शकतो तसेच गीतेचं श्रवण करावं.
गीता जयंती मोक्षदा एकादशीच्या दिवशी असते. त्याच दिवशी जगताचा पालन हार भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते.
।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
राम कृष्ण हरी ....
ह.भ.प.दिपक महाराज शिंदे (एम.ए.बी.एड.संस्कृत)
महाराज सुंदर
उत्तर द्याहटवाDhanyvad
हटवा